Chhagan Bhujbal On Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित बनवण्याच्या संकल्पासह आमचे सरकार पुढे जात आहे. चार वर्षांमध्ये तेजीने आर्थिक विकास झाला आहे. जुलैमध्ये विकसित भारताचा रोडमॅप सादर करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, संरक्षण आणि रेल्वेवर अधिक भर देण्यात आला असून, शेती आणि शेतकरी कल्याण यासाठी कमी तरतूद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला, राज्यांना कर्ज देणे, दळणवळण सुधारणे अशा अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखे काहीही नाही. कॉर्पोरेट टॅक्सवर सवलत देण्यात आलेली आहे. अनेक नवीन विमानेही येतील. लहान-लहान शहरात मेट्रो आणण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक अर्थसंकल्प
मत्स्य व्यवसाय वाढण्यासाठी फार मोठे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे. राज्यांना बिनव्याजी कर्ज, मोफत धान्य देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चशिक्षण संस्था तयार करणार, पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग, मोफत वीज, एम्स रुग्णालय यांसारखे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. सर्व घटकांमध्ये योजना आखण्याचे ठरण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसमावेशक असा आहे, या शब्दांत छगन भुजबळ यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आशा व आत्मविश्वास, असा हा अंतरीम अर्थसंकल्प आहे, 'जय अनुसंधान' हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास देणारा आहे, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.