Dhananjay Munde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेते प्रचाराला लागले आहेत. महायुतीचा जो उमेदवार असेल, त्याचा प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. काही जागांवरून महायुतीचे जागावाटप अडले असले तरी अन्य घोषित उमेदवारांच्या प्रचाराला, सभांना सुरुवात झाली आहे. यातच बीड येथून भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली असून, धनंजय मुंडे बहिणीच्या प्रचारासाठी सरसावले आहेत. या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे ऐतिहासिक विजय नोंदवतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे..
पंकजा मुंडे यांना लोकसभेत विजय करण्यासाठी महायुतीचे विद्यामान आमदार, माजी आमदार आणि कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे ऐतिहासिक विजय नोंदवणार
विरोधात लढलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने पंकजा मुंडे ऐतिहासिक मताने विजयी होतील. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांमध्येच लढत व्हायची. आता राष्ट्रवादी भाजपसोबत आल्याने बीड जिल्ह्यात महायुतीची मोठी ताकद वाढली आहे. महायुतीची ऐतिहासिक अशी एकजूट झाली असून शिवसेना शिंदे गट आणि मनसेसह अनेक मित्रपक्ष आमच्य सोबत आहेत. पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित होईल, असे धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, बजरंग सोनवणे यांना अनेक वेळा संधी दिली. त्यांनी काय विकास केला याचा हिशोब द्यावा. त्यानंतरच बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.