“झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...”; अजितदादा गटाचे नेते थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:36 AM2023-11-13T10:36:33+5:302023-11-13T10:42:04+5:30
NCP Ajit Pawar Group: प्रतिज्ञापत्रावरून शरद पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला अजितदादा गटाकडून उत्तर देण्यात आले.
NCP Ajit Pawar Group: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, खरा पक्ष कुणाचा यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षावर दावा केला होता. मागील सुनावणीवेळी अजित पवार गटाने सादर केलेली प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवारांचा आवाज जवळून ऐकला, तर तो आवाज बसलेला होता हे लक्षात येईल. मला वाटते आता ते व्यवस्थित झालेले असतील. अजित पवारांचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे अजित पवार आत एक आणि बाहेर एक असे करणारे नाहीत. सरळ तोंडावर सांगणारे निर्भिड व्यक्ती आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रतिज्ञापत्रावरून आरोप करण्याऱ्यांना उत्तर दिले. ते मीडियाशी बोलत होते.
झोमॅटो असो वा स्विगी असो, आमच्या पक्षाची प्रतिज्ञापत्र...
खोट्या प्रतिज्ञापत्रांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. यावर बोलताना, झोमॅटो असो, स्विगी असो, आमच्या पक्षात त्या प्रत्येक कामगारांचा विभाग आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून ते प्रतिज्ञापत्र दाखल केले असतील. प्रतिज्ञापत्र खरी आहेत की खोटी हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला पक्षाला नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार हे तोंडावर बोलणारे व्यक्ती आहेत, ते नाटक करणारी व्यक्ती नाही. त्यांनी आयुष्यात कधीही नाटक केले नाही. त्यांना खरोखर डेंग्यू झाला होता. आम्ही स्वतः दोन तीन वेळा त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठका घेतल्या. त्यावेळी ते आजारी होते, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.