नागपूर – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेवरून नवा संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थकांनी पडळकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत पडळकरांना भरचौकात जोड्याने मारून काळे फासेल त्याला १ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. नागपूरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर बोचरी टीका केली.
अजित पवार गटातील नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले की, जिथे पडळकर दिसेल तिथे भरचौकात त्यांना जोड्याने मारा, काळे फासा आणि नागपूरात येऊन १ लाख रुपये घेऊन जा असं आवाहन मी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करतोय. जोपर्यंत गोपीचंद पडळकर यांना त्यांची जागा दाखवणार नाही तोपर्यंत ते सुधारणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी काल समज दिली आहे. परंतु त्यांना पडळकरांना अखेरचं सांगायला हवे जर यानंतर ते बडबडले तर पक्षातून काढायला हवे. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर बोलण्याची तुझी लायकी आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच नागपूरमध्ये गोपीचंद पडळकर आले तर त्यांना सोडणार नाही. नागपूरला येऊ नका, नागपूरला आल्यावर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पडळकरांना आम्ही सोडणार नाही. भाजपाचे वरिष्ठ नेतेही नाराज झाले आहेत. आरक्षण घ्यायचे असेल तर आंदोलन करा, तुमच्यात धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन आंदोलन कर, या चोराला धनगर समाजाच्या आरक्षणाची चिंता असेल तर आजच्या आज आमदारकीचा राजीनामा द्यावा असं आव्हान प्रशांत पवार यांनी केले आहे.
पडळकरांचा अजित पवारांवर शाब्दिक हल्ला
धनगर समाजाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलेले नव्हते. याविषयी माध्यमांनी विचारले असता, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे धनगर समाजाविषयी पोटात एक आणि ओठात एक आहे. अजित पवार यांची आमच्या समाजाविषयी भावना स्वच्छ नाही, लबाड लांडग्याचे ते लबाड पिल्लू आहे,' असे विधान पडळकर यांनी केले होते.