NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या चिंतन शिबिरात बोलताना नेत्यांनी केलेल्या टीकेला शरद पवार गटाने उत्तर दिले. शरद पवार गटाने केलेल्या दाव्यांवर अजित पवार गटातील नेते पलटवार करत आहेत. यातच जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत असल्याची बोचरी टीका अजित पवार गटातील एका नेत्याने केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर वाढलेल्या पोटावरून टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांविरोधात टिपण्णी केली. अजितदादा, त्यादिवशी तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला, तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अॅब्ज’ केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला होता. याला आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत
जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. त्यांना राखी सावंत का म्हणतोय? कारण चित्रपटसृष्टीत असली तरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच जितेंद्र आव्हाड आहेत. नेहमीच प्रसिद्धीझोतात येण्यासाठी काहीतरी वादंग निर्माण करणे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा व्यवसाय आहे. म्हणून ते अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. त्यांच्या एवढ्या गोष्टी आमच्याकडे आहेत की, दादा मला माफ करा, असं म्हणायची वेळ त्यांच्यावर येईल, या शब्दांत सूरज चव्हाण यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड कधीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. ते कधीही भाजप विरोधात बोलत नाहीत. ते कधीही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाहीत. ते फक्त विचारधारेच्या गोष्टी करतात. विचारधारेच्या गोष्टी करून ते भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याच्या पत्रावर सहीही करतात आणि संधी बघून ते विरोधही करतात, असे जितेंद्र आव्हाड आहेत, असा घणाघात सूरज चव्हाण यांनी केला. दुसरीकडे, रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवर टीका करताना ते म्हणाले की, ही संघर्ष यात्रा नाही तर पिकनीक सुरु आहे. या यात्रेवर मीच नाही संपूर्ण जनता टीका करत आहे. यांच्या राशीत कधीच संघर्ष नव्हता आणि संघर्ष यात्रा काढत आहेत. राहुल गांधीनी ज्याप्रमाणे देशात भारत जोडो यात्रा काढली. तसाच प्रकार रोहित पवार महाराष्ट्रात करत आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.