NCP Ajit Pawar Group News ( Marathi News ): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पक्ष आता चांगलेच कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर अजित पवार गट आणि शिंद गट कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील, असा दावा करणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. महायुतीत अंतर पडेल असे काही वागू नका, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच भेटीगाठी कौटुंबिक असून कुठेही मॅचफिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही. हवे तर हे स्टॅम्पवर लिहून देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, पण...
मार्च महिन्यात आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी संघटनात्मक काम करा. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामी विचार हा पक्षाचा आत्मा आहे. ही विचारधारा सोडायची नाही त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तर चालेल, असे अजित पवार यांनी नमूद केले. ज्येष्ठांवर टीका करायची नाही पण कोणी आपल्या नेत्यांवर बोलले तर जशास तसे उत्तर द्या, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. कमळाच्या चिन्हावर नाही तर आपण घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार. प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमानाप्रमाणे नवी पीढी पुढे येत असते, त्यांना मार्गदर्शन करावे लागते. मात्र, काही जण ऐकायला तयार नव्हते. काही जण जाणीवपूर्वक सांगत आहेत की हे कमळावर लढणार आहेत. पण असे काही नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्याला गद्दारी, मॅच फिक्सिंग करायची नाही. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे. खरगे यांचे नाव काँग्रेसकडून पुढे येत आहे. मोदींविरूद्ध खरगे यात तुम्हीच विचार करा की खरगे यांनी काही फार मोठे नेतृत्व केले नाही. जनता मोदींनाच पाठिंबाच देईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.