NCP Ajit Pawar Group Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी आपापली बाजू भक्कम असल्याचे सांगत आयोगाकडे कागदपत्रे, पुरावे जमा केले आहेत. शरद पवार गटाने ८-९ हजार प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. अजित पवार गटापेक्षा जास्त कागदपत्रे सादर केल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. यावर खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचीच असून, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिले असल्याचा दावा अजित पवार गटातील एका नेत्याने केला आहे.
अजित पवारांनी २ जुलै रोजी ८ सहकाऱ्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. अजित पवार गटासोबत ४३ ते ४५ आमदार असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात कुठल्याही गटाने अशी अधिकृत माहिती दिलेली नाही. यासंदर्भात आता केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार उपस्थित राहिले होते.
निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत
आमच्याकडे असलेला पक्ष खरा पक्ष असून त्याचे पुरावे निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ट्रकभर पुरावे आयोगाकडे सुपूर्द केल्याने योग्य तोच निर्णय लागेल, अशी अपेक्षा हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, मंत्रिमंडळ बैठकीत गँगवॉर झाल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याला हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी केलेला दावा खोटा आहे. असा कोणताही वाद झाला नाही. ही चुकीची माहिती आहे. संजय राऊत हे सिद्ध करू शकले की अंगावार धावून वगैरे गेले, तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले आहे.
कुणीही गैरसमज करुन घेऊ नये
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. त्यामुळेच आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. ज्यांना कुणबी दाखले आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण द्यावे, असे भुजबळ बोलले आहेत. त्यामुळे कोणताही वाद नाही. कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असे हसन मुश्रीफांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कमजोर व अस्थिर सरकार बसले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणी जुमानत नाही भाजपवाले त्यांना जुमानत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या मंत्र्याच्या अंगावर दुसरा मंत्री धावून जाण्याची परिस्थिती सुरू आहे, ही परिस्थिती याआधी निर्माण झाली नव्हती. मुख्यमंत्री जर आपल्या मंत्र्यांवरती नियंत्रण मिळू शकत नाही तर मंत्र्यांमध्ये प्रमुख म्हणून बसण्याचा त्यांना अधिकार नाही, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला होता.