Bageshwar Baba Darbar In Pune:बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. देशभरातील अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा यांच्या दिव्य दरबाराचे आयोजन केले जात असते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात सहभागी होण्यासाठी हजारो-लाखो भाविक येत असतात. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा यांचे दरबार भरले होते. यातच भाजपने बागेश्वर बाबा यांच्या दिव्य दरबाराचे आयोजन केले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने याला आक्षेप घेतला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबार आयोजनावरून भाजप-अजितदादा गट आमने-सामने आल्याचे चित्र असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.
पुणे शहरात बागेश्वर धाम सरकार यांचा कार्यक्रम २० ते २२ नोव्हेंबर रोजी जगदीश मुळीक फाउंडेशनकडून आयोजित केला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष यांनी यासंदर्भातील बॅनर्स शहरात लावले आहे. हनुमान कथा सत्संग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबारही भरणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून बागेश्वर बाबा यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. एकीकडे कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपकडून होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाला विरोध होत आहे.
जगद्गुरु संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात पुण्यामध्ये होत असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. सोशल मीडिया फेसबुक पेजवर ‘जगद्गुरु संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही’, अशी पोस्ट करत धीरेद्र शास्त्री यांचा फ्लेक्स पोस्ट केला आहे. अजितदादा गट आणि भाजप सत्तेत एकत्र असताना अजितदादा गटाकडून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून बागेश्वर बाबा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.