NCP Ajit Pawar Group Rupali Patil Thombare News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडीच्या यशानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून ठाकरे गटात येण्याबाबत खुली ऑफर दिली आहे. यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली. यानंतर अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. अशातच अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साद घालत पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हटलेय?
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील ठोंबरे यांचा फोटो शेअर करत, निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या… तरिही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…, अशी पोस्ट करत रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर दिली.
सुषमा अंधारे यांच्या ऑफरवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली भूमिका स्पष्ट
राजकारणात सुषमा अंधारे माझ्या मैत्रीण आहेत. मात्र त्यांनी ऑफर दिली असली तरी मी अजित पवार यांच्यासोबत काम करणार आहे. सुषमा अंधारे यांनी अशा प्रकारची ऑफर देणे हे राजकारणातील महिलांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे. त्यामुळे स्त्री शक्तीला राजकारणामध्ये बळ मिळेल. सुषमा अंधारे यांनी त्यांना राष्ट्रवादीविषयी ज्या काही गोष्टी वाटल्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी ऑफर दिल्याबद्दल आभारी आहे. येणाऱ्या काळात अजित पवारांसोबत काम करणार आहे. माझी मुस्कटदाबी होत असेल तर समोर येऊन नक्की सांगेन. पुढील काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी मिळेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेची ऑफर सध्यातरी स्वीकारली नाही, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.