NCP Ajit Pawar Group Vs Thackeray Group: अजित पवारांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी ही गद्दारी समजली गेली आणि तसे चित्र निर्माण करण्यात आले. अजित पवारांनी तो निर्णय परस्पर घेतला होता, असे सांगितले गेले. परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती अजित पवारांनी कुणाला न विचारता असा निर्णय घेतला असता तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केले असते का? असा सवाल करतानाच यामध्ये अजित पवारांची काहीही चूक नाही, हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर अजित पवारांना उपमुख्यमंत्री करा असे ठरले त्यामुळेच वरिष्ठांना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.
मीडियाशी बोलताना उमेश पाटील म्हणाले की, अजित पवार यांना पक्षात माफी मागायला लावून परत घेतले, हे जे सांगितले जाते ती वस्तुस्थिती नव्हती तर सर्व आमदारांचे समर्थन अजित पवारांना होते. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे, असे उमेश पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांनी एका मुलाखतीत अजित पवारांवर जे मुद्दे मांडले, ते सर्व खोडून काढले.
वरिष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला
उमेश पाटील यांनी पुढे सांगितले की, २००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने वरिष्ठांनी पक्षात यु टर्न घेतल्यामुळेच अंतर्गत कलह वाढला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली. कधी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कधी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. या पुत्र आणि मुलीच्या प्रेमातून दोन्ही पक्षात फूट पडलेली दिसत आहे. हीच कारणे त्यामागे दडलेली आहेत, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय राऊत खोटे बोलतात. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता. २०१९ मध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांना करणार होते. रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांना करावे असे ठरले. परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील, याबाबत चर्चा झाली. भाजपासोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. अजित पवार यांना क्षमा करून उपमुख्यमंत्री केले असा दावा केला जातो. परंतु, शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.