अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 05:00 PM2024-05-08T17:00:19+5:302024-05-08T17:02:02+5:30
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP battle, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना धार
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP battle, Lok Sabha Election 2024: देशामध्ये सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणात जनतेमधून प्रतिसाद मिळत आहे. ४ जून नंतर देशांमध्ये इंडिया आघाडीचे सरकार येईल अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. जनतेने मोदींची गॅरंटी नाकारली आहे. त्यामुळेच देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल. महाराष्ट्रात एकाही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अजित पवार गटाला खोचक टोला लगावला.
"देशामध्ये सध्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये जनतेने मोदींची गॅरंटी नाकारली आहे. भारतीय जनता पार्टी कडून देण्यात येणारे आश्वासन यांना बळी न पडण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. जनतेला हे माहित झाले आहे की भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे. त्यामुळे ४ जून नंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल. लोक पुन्हा एकदा नेहरू गांधीच्या विचारांकडे वळू लागल्याने भाजपाचे धाबे दणाणले आहेत. काल देशात तिसऱ्या टप्प्याचे मतदान झालं, महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकांनी मतदान केलं. या ११ लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा व त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिली आहे," असा विश्वास तपासेंनी व्यक्त केला.
"भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराकडे लोकांनी पाठ फिरवली. इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते हे तत्वत: भारतीय जनता पार्टीने मान्य केले असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार मतदानाला उतरला नाही हे चित्र आपण सर्वांनी पाहिले," असा दावाही तपासे यांनी केला.