Chhagan Bhujbal Criticized Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ सातत्याने चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येछगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत. अशातच आता छगन भुजबळ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना ज्या माणसाने अटक केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले, अशा आशयाचे विधान राज ठाकरे यांनी केले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिले. माझ्यासमोर जी फाईल आली ती फाईल होम डिपार्टमेंट म्हणून माझ्याकडे आली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हा आम्ही सांगितले होते की, श्रीकृष्ण कमिटीचा जो अहवाल आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करु. त्यानंतर कारवाई केली होती. माझ्यापुढे तेव्हा मार्गच नव्हता, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली
राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला. शिवसेना सोडून त्यांनी चूक केली. एकमेकांवर टीका झाली. शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा दोघांना फोन केला आणि सांगितले की, पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलते. दोघांनीही ऐकले पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतला, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते टीव्ही९ शी बोलत होते.
दरम्यान, राज ठाकरेंना विचारु इच्छितो की, राज ठाकरे लहान होते, तेव्हा शाळेतून आले नाहीत की, बाळासाहेब आणि माँ विचारायच्या राजा का आला नाही? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब जेवत नव्हते. तुमचे रक्ताचे नाते आहे. माझे आणि बाळासाहेबांचे तर मतभेद झाले. मंडल आयोग किंवा इतर कशावरुन. पण राज ठाकरेंचे काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचे होते की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही वेगळे व्हायचे कारण काय? तुमची काय मागणी होती सांगा लोकांना. मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नकोत? अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली.