Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले आहेत. याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठे विधान केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत गुरुवारी निर्णय लागू शकतो. याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते यावर भाष्य करत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडताना दिसत आहे. तर दुसरीकडे निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडून केला जात आहे. निकालानंतर आमदार अपात्र ठरले, तर सरकार कोसळेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. याबाबतही अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे
आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. मधल्या काळात खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्ये केली की घटनाबाह्य सरकार वैगरे. पण ते सरकार चालवत आहेत, त्यांनी अर्थसंकल्प घेतला, बहुमताने बसलेल्या सरकारच्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत असल्याचे आपण गेल्या अकरा महिन्यांपासून पाहत आहोत. १४५ आमदारांचे पाठबळ त्यांच्याकडे जोपर्यंत आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता
ही गोष्ट घडली त्याला आता जवळपास अकरा महिने झाले. आपण सर्वजण वाट पाहात होतो की कधी निर्णय येतो. आता अखेर यावर निर्णय येणार आहे. निकाल काहीही लागला तरी माझे स्वतःच मत आहे की, सर्वोच्च न्यायालय यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता असेल. काही मोठ्या वकिलांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितले की, विधिमंडळातील ही बाब आहे त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.