Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पक्षाच्या या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावली. यानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नावावर चालतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांत कोरोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आले नाही. महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. आता कोरोनाचे सावट दूर झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशने घ्यावीच लागतात, असे अजित पवार म्हणाले.
सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी केवळ शरद पवार यांचाच अर्ज आला. मूळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो, हे आपल्याला माहीत आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावेत, अशी देशातील कार्यकर्ते, नेते, आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर शरद पवारांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे अवघ्या दहा मिनिटांत मंजूर केल्याचे त्यांनी म्हटले होते. संबंधित कायद्याबाबत चर्चा करण्याचा संसदीय अधिकारही अस्वीकार करण्यात आला होता, असे त्यांनी म्हटलं होते. याशिवाय देशातील बेरोजगारी आणि महिला सन्मानाच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता.