Maharashtra Politics: “आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 12:33 PM2022-10-08T12:33:21+5:302022-10-08T12:33:58+5:30
Maharashtra News: ते दहा कोटी कुठून आले? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, इथे हे चालणार नाही, असे सांगत अजित पवारांनी शिंदे गटाला इशारा दिला.
Maharashtra Politics: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. अलीकडेच झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुनही विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. याला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटाला रोखठोक शब्दांत इशारा दिला आहे.
आम्ही तुमच्यावर बारकाईने यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. ४० आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरात गद्दार लोकं निघाली आहे. कोल्हापुरात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे अजित पवार म्हणाले. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, ज्या ज्यावेळी शिवसेना फुटली. त्या त्यावेळी निवडणुकीत आमदार पडलेत, हा इतिहास आहे. नारायण राणे तर पोटनिवडणुकीतही पडले, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
सभेसाठी ते दहा कोटी कुठून आले?
एकनाथ शिंदे म्हणत होते की, लोक स्वतःहून आले. मग भाषणावेळी उठून का जाते होते, अशी विचारणा करत, सभेला कोट्यावधींचा खर्च केला. ते दहा कोटी कुठून आले? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, असे इथे चालणार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला लोकांमधून समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला समोरून प्रतिसाद मिळत होता, असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर खोचक शब्दांत टीका केली.
दरम्यान, बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणण्यासाठी एसटी बसेस, तसेच मेळाव्याच्या प्रमोशन, जाहिरात, समर्थकांच्या खाण्याची सोय आदींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले. नोंदणी नसलेल्या एका पक्षाकडे इतकी रक्कम कशी आली? त्यांच्या वतीने कोणी खर्च उचलला? त्यांच्या पैशाचा स्रोताबाबत मनी लाँड्रिंग ॲक्ट व आयकर कायद्याच्या तरतुदीअंतर्गत चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वादात सापडण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"