Ajit Pawar: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून या प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट दिली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक आरोपपत्र दाखल केले आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे नाव नाही, असे म्हटले जात आहे. २०२१ मध्ये ईडीने या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास ६५ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
मला अन् सुनेत्रा पवारांना ईडीकडून क्लीन चिट...
मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील तपशील मला माहिती नाही. मला शरद पवार फक्त म्हणाले होती की, उद्धव ठाकरे मला भेटायला येणार आहेत. बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यामुळे उद्धव ठाकरे भेटायला आले असतील. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे दोघेही भेटायला आले होते. तास दीड तास त्यांच्यात चर्चा झाल्याचे बातम्यांवरून माहिती मिळाली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"