Ajit Pawar News: विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत कोणतेही पद द्यावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात केली होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते. अजित पवार यांना इतके महत्त्वाचे पद मिळूनही ते का नको, असा प्रश्न तेव्हापासून अनेकांना पडला. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. छगन भुजबळ यांनी पक्षाने जबाबदारी दिल्यास प्रदेशाध्यक्ष पदाचे काम करीन, अशी इच्छा व्यक्त केली. यादरम्यान अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद का नको, याचा खुलासा स्वतः त्यांनीच केला. आतापर्यंत सरकारमध्ये अनेक पदे भूषवली. त्यामुळे आता पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात वाईट काय? असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच पक्ष संघटनेत काम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ३२ वर्षांत आपण आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी विविध पदे भूषवली. आता पक्षासाठी काम करायचे आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पक्ष संघटनेतील पद मागण्यात गैर काय, भुजबळांची मागणीही योग्य
पक्ष संघटनेत पद मागितले तर त्यात वाईट काय आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली त्यात काही गैर नसल्याचे पवार म्हणाले. मी पक्षाच्या व्यासपीठावर माझी मागणी मांडली आहे. तेथे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी निर्णय पक्षाला घ्यायचा असतो. भुजबळ यांनी मागणी केली आहे, तो त्यांचा अधिकार आहे. सर्वांना बरोबर घेवून जायचे असेल तर पक्षात सर्व घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये, त्यामुळे त्यांनी केलेली मागणी योग्यच आहे. यासंबंधी आम्ही चर्चा करू. कोणत्याही पक्षात लोकशाही मार्गाने मते मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पक्ष घेईल तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या संघटनेत यापूर्वी छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, आर. आर. पाटील, अरुण गुजराथी, सुनील तटकरे, जयंत पाटील, मधुकर पिचड यांनी अध्यक्षपदे भूषवली आहेत. मी तर जे योग्य वाटेल ते पद द्या अशी मागणी केली असल्याचे अजित पवार म्हणाले.