“२०२४ला NCPचा CM होणार”; जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांची मोजकी प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:00 PM2023-04-30T21:00:21+5:302023-04-30T21:02:37+5:30
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भविष्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे बॅनर राज्यात काही ठिकाणी लागल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अजित पवार यांनी यावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. यावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का?
जयंत पाटील यांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचे म्हणणे खरे ठरो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास फायदा होईल का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्यास निश्चित फायदा होईल, हे सांगण्यासाठी एखाद्या ज्योतिषाची गरज नाही, तीन पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर ज्या उद्देशाने भाजपने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन सरकार अस्तित्वात आणले, याला दहा महिने पूर्ण झाले, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचे दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे जे आमदार गेले, त्यांच्या मतदारसंघातील मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सत्ता येईल, मग महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यानंतर नक्कीच मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल. त्या विषयी दुमत नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तोदेखील महाविकास आघाडीचा निर्णय होता. अशाप्रकारचे निर्णय भविष्यात घेण्यात येतील, असे संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"