Maharashtra Politics: “द्रोह वाटत असेल तर केस करा, जिवात जीव असेपर्यंत...”; अजितदादांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:52 PM2023-01-06T12:52:57+5:302023-01-06T12:53:53+5:30
Maharashtra News: त्यांच्या हातात सत्ता आहे ना, असे सांगत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा वाद अद्यापही शमताना दिसत नाही. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना, अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर करा केस दाखल, या शब्दांत अजित पवारांनी पलटवार केला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली होती. याबाबत अजित पवार यांना पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला पुन्हा पुन्हा हे विषय वाढवायचे नाहीत. मला माझे काम करत राहायचे आहे. आम्ही आमच्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटत असेल, तर त्यात केस दाखल करा. ही केस नियमात बसते का? आम्ही जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आमच्याकडून कधीही द्रोह होणार नाही. आमच्या पुढच्या १० पिढ्यांमध्येही तसा द्रोह होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी बोलायचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय?
प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे. मी मांडलेली भूमिका सगळ्यांना पटलीच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पण मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते कोण? माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय? राज्यपाल, सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केली, अपशब्द वापरले, त्याबाबत कुणी बोलायला तयार नाही. यातून कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. त्यांना त्यांची जी भूमिका मांडायची, ती त्यांनी मांडावी. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचे जनता स्वागत करेल, असे अजित पवारांनी रोखठोकपणे सांगितले.
नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर भाष्य करताना, छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"