Ajit Pawar: “बारामतीत लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो, धडका माराल तर डिपॉझिट जप्त होईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:34 PM2022-09-08T15:34:35+5:302022-09-08T15:34:47+5:30
Ajit Pawar: बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही. त्यापेक्षा भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
मुंबई: आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मागील वेळेस थोडक्यासाठी पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामतीचाही समावेश आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे असून, आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहे. यातच राष्ट्रवादीचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. बारामतीला धडका मारू नका. डिपॉझिट जप्त होईल, असा इशारा दिला आहे.
भाजपचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला होता. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे मोठे नेते आहेत. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. शरद पवारांनी नादी लागू नये, या शब्दांत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप नेत्यांच्या या टीकेचा अजित पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेत थेट इशारा दिला.
बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही
बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही. त्यापेक्षा भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. गेल्या वेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला. मी रोज सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतो. माझ्या मतदारसंघात लाखाच्या मताधिक्याने विजयी झालो आहे. आपली ताकद मोठी आहे, असे म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.
दरम्यान, शिंदे सरकार स्थगिती सरकार आहे. सध्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष चांगले काम केले होते. यांना कोणी खोके सरकार म्हटले की राग येतो, असा पलटवारही अजित पवार यांनी केला.