'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 09:49 PM2024-02-06T21:49:00+5:302024-02-06T21:49:16+5:30
'लोकशाहीत बहुसंख्य लोक पक्ष चालवतात, आमच्यासोबत पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आहेत.'
NCP Ajit Pawar Sharad Pawar ( Marathi News ) : निवडणूक आयोगाने शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे. यामुळे अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. या निर्णयानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.
निकील नम्रपणे स्वीकारतो
कोणत्याही पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची पद्धत आहे. यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. आमचे म्हणणे मांडले, इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले. लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह घडाळ आणि झेंडा आम्हाला मिळाल्या. आमच्या सोबतच्या 50 आमदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. विधासभेत अध्यक्षांसमोरही सुनावणी झाली आहे. ते कधी निकाल देतील ते माहिती नाही. ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.
नवीन पिढीला बरोबर घेऊन...
पक्ष पळवल्याचा आरोप विरोध करत आहेत, असा प्रश्न केला असता अजित पवार म्हणाले, पक्ष पळवण्यचा प्रश्नच कुठे येतो? कोण काय बोलतो, त्याचा आम्ही विचार करत नाही. मी कोणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. आयोगाने आमची बाजू खरी मानली. त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर कोर्टात गेलो असतो. आम्ही राज्याची कामे करण्यासाठी इथे आलो आहोत. नवीन पिढीला बरोबर घेऊन राज्यासाठी कामे करत राहू, असंही पवार म्हणाले.
बहुमत आमच्याकडे आहे
अजित पवार पुढे म्हणतात, 50 पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत, राज्यातील सर्वाधिक जिल्हाध्यक्ष आमच्याकडे आहेत, पदाधिकारी आमच्याकडे आहेत. आमची भूमिका त्यांना योग्य वाटली होती, त्यामुळेच ते सर्व आमच्या बाजूने आले. लोकशाहीत बहुसंख्य लोक पक्ष चालवतात, आमच्यासोबत पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आहेत. आयोगाने जो निर्णय दिला, तो मान्य करावा लागतो. तुम्हाला निकाल मान्य नसेल, तर कोर्ट आहे. आम्हाला त्याचा उतमात करायचा नाही. विरोधकांना टीका करण्याशिवाय काही उरले नाही. येणाऱ्या काळात आमच्यासोबत येतील त्यांचे आम्ही स्वागत करू, बेरजेचे राजकारण करत राहू.