"तमाशाला तुला घेऊन जातो"; शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी दिली समज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 09:23 AM2024-10-08T09:23:02+5:302024-10-08T09:40:56+5:30
साताऱ्यात एका कार्यक्रमात शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिली.
DCM Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच ओळखले जातात. कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना अनेकदा अजित पवार हे आपल्या खास शैलीत समज देताना दिसतात. अशाच एका अतिउत्साही कार्यकर्त्याला अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत समज दिली. अजित पवारांनी कार्यकर्त्याला दिलेल्या सल्ल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. अजित पवारांनी कार्यकर्त्यांची फिरकी घेतल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा साताऱ्याच्या वाई मतदारसंघात दाखल झाली. महायुती सरकारच्या कामांची माहिती यावेळी अजित पवार यांनी सभेत दिली. तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देखील अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी अजित पवार यांच्या भाषणादरम्यान एक अतिउत्साही कार्यकर्ता वारंवार शिट्या वाजवत होता. त्यावेळी शिट्या वाजवणाऱ्या त्या कार्यकर्त्याला अजित पवार यांनी समज दिली. तू सारखी शिट्टी वाजवत आहेस मी मगापासून बघितोय, आता पोलिसांच्या ताब्यात देईन, असा इशारा अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिला. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिलेल्या सल्ल्याने सर्वांनाच हसू फुटलं.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार हे कार्यक्रमात भाषण करत असताना एका कार्यकर्त्याने शिटी वाजवली. त्यानंतर अजित पवारांनी भाषण थांबवलं आणि कार्यकर्त्याला समज दिली. "तू सारखी शिट्टी वाजवतो. मी तुला मघापासून बघितलं आहे. आता पोलिसांच्या ताब्यात देईल. इथे माझ्या माय माऊली बसल्या आहेत. त्यांच्यासमोर शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती कशी आहे. आपण तमाशाला गेल्यावर शिट्टी वाजवायची, फेटा.... तेव्हा जाऊ. त्यावेळी तुला घेऊन जातो. तुझा अपमान करायचा नाही. तुझा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे, म्हणून जरा दमानं घे," अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतली.
"आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं काम करत आहोत. सरकारमध्ये नव्हतो त्या काळात आपल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, नंतरच्या काळात ती स्थगिती उठवण्यात आली.मायमाऊलींनी गुलाबी फेटे घातलेत मी देखील तसाच घातला आहे. मायमाऊलींना पैसे आले का विचारायचो, त्या समाधानानं आणि आनंदानं त्या प्रतिसाद देत होत्या. दादा पैसे आले असं सांगतात त्यावेळी आनंद वाटतो. खूरपणीला जाणाऱ्या बहिणीकडे कुणाचं लक्ष आहे असा विचार यायचा," असं अजित पवार म्हणाले.