Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 09:58 PM2022-09-15T21:58:07+5:302022-09-15T21:59:17+5:30
एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याऐवजी गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाराऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती आणि नशा आहे. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली आहे.
शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा खरमरीत सवाल संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जबाबदारी आपल्या मुलाला दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्याला बाजूला केले. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. तसेच कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाहीत. एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणून पालकमंत्री नियुक्त होत नाहीत, असा दावा अजित पवार यांनी केला.
शिंदे-फडणवीस सरकारला गांभीर्य नाही
अजित पवार यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना राज्य शासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना, पालकमंत्र्यांना नेमणुका थांबल्या असल्याने शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही. निधीच्या परवानग्या थांबल्या आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे रखडून पडले आहेत, असे सांगत शिंदे-भाजप सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
दरम्यान, मविआच्या काळात देखील अनेक उद्योग परराज्यात गेल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. तसेच या उद्योगांची यादीच जाहीर करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले होते. याबाबत पवार यांना प्रश्न विचारला असता मविआच्या काळात सामंत देखील मंत्री होती. मात्र, तेव्हा सामंत गप्प का होते ? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.