New Parliament Inauguration: २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील १९ पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. असे असले तरी भव्य सोहळ्यात नवीन संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत नवीन संसद भवनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला न जाण्याची भूमिका घेतली होती. संसद भवनाच्या लोकार्पणानंतर शरद पवार यांनी सोहळ्यावर खोचक शब्दांत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही शरद पवारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. जुनी वास्तू मला प्रिय आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. यानंतर मात्र आता अजित पवार यांनी वेगळा सूर आळवला असून, आम्हाला एक छान संसद भवन मिळाल्याचे म्हटले आहे.
शेवटी आम्हाला एक छान संसद भवन मिळाले
नव्या संसद भवनात सर्वांनी संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. सर्वांनी सहभागी व्हावे. याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. जुनी संसद ब्रिटिशांनी बांधली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभा इमारती बांधल्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची नवीन इमारत असावी, अशी चर्चा सध्या आहे. संसदेची जुनी इमारत बांधली तेव्हा ३५ कोटी लोकसंख्या होती. आता १३५ कोटींचा आकडा पार झाला आहे. म्हणजे लोकप्रतिनिधीही वाढले आहेत. मला व्यक्तिशः असे वाटते की, या नवीन इमारतीची गरज होती. कोरोनाच्या काळात विक्रमी वेळेत बांधकाम पूर्ण केले आणि शेवटी आम्हाला एक छान संसद भवन मिळाले, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
दरम्यान, हा कार्यक्रम मी एक-दोन तास पाहिला. मी या कार्यक्रमाला गेलो नाही हे बरे वाटले. तिथे धार्मिक कार्यक्रम केले गेले. यामुळे नेहरूंची आधुनिक भारताच्या संकल्पनेस धक्का बसत आहे. हे चिंताजनक आहे. आपला देश गेल्या अनेक वर्षांपासून मागे जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.