नागपूर : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांना महायुतीपासून दूर ठेवावं, अशी विनंती करणारं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलं आणि हे पत्र सार्वजनिकही केलं होतं. यावर आज अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. "पत्राबद्दल जे काही करायचं ते मी करेन, माध्यमांसमोर ते सांगायची गरज नाही," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसंच नवाब मलिक यांनी याबाबत त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर मी सविस्तर प्रतिक्रिया देईन, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर बोलताना अजित पवार काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.
"नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सध्या कोर्टाने जामीन दिलेला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींबद्दल नवाब मलिकांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन. त्या पत्राबद्दल काय करायचं, ते माझं मी बघेन, ते मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही," असंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो," असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. भविष्यात याबाबत अजित पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.