Maharashtra Politics: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर करण्यात आली. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाष्य करताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकरांचा बोलविता धनी कोण?
प्रकाश आंबेडकर हे साध्या स्वभावाचे आहेत. एकाद्या व्यक्तीच्या साध्या स्वभावाचा फायदा भाजप घेऊ शकते. शरद पवारांबद्दल जे विधान करण्यात आले, ते प्रकाश आंबेडकरांचे शब्द नाहीत. त्यामुळे त्यांना सांगणारे मास्टरमाईंड कोण? हे पुढे आले पाहिजे. शरद पवार आणि आमचे जुने भांडण आहे. परंतु, युतीत त्यांनीही यावे, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले असतील, तर त्यांना अशा प्रकारे बोलायला कोणी भाग पाडले? कारण प्रकाश आंबेडकर अशा प्रकारे बोलू शकत नाहीत. त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधले पाहिजे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावे. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकले जाऊ नये. हे पटण्यासारखे नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"