“वेट अँड वॉच, अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच”; अमित शाहांचे नाव घेत NCP नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:39 PM2023-04-27T16:39:30+5:302023-04-27T16:40:10+5:30

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

ncp amol mitkari claims maha vikas aghadi govt will come and ajit pawar will be the cm of the state | “वेट अँड वॉच, अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच”; अमित शाहांचे नाव घेत NCP नेत्याचा मोठा दावा

“वेट अँड वॉच, अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच”; अमित शाहांचे नाव घेत NCP नेत्याचा मोठा दावा

googlenewsNext

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू झालेली चर्चा शमताना दिसत नाही. अजित पवार यांनी अनेकदा यावर स्पष्टीकरण देत खुलासे केले आहेत. मात्र, यातच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेत अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. 

महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले अजित पवारांचे काही बॅनरही लावण्यात आले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी सदर दावा केला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे राजकारण सांभाळू शकेल, असा अजित पवारांसारखा दुसरा तोलामोलाचा नेता महाराष्ट्रात नाही, हे दस्तुरखुद्द अमित शाह यांनी कबुल केले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच आहेत. वेट अँड वॉच, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सक्तीच्या रजेवर गेले आहेत, त्याचा कृपा करून याच्याशी संबंध लावू नका. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि अजित पवार मुख्यमंत्री पदावर दिसतील, असे अमोल मिटकरी म्हणाले. दुसरीकडे, अजित पवार मुख्यमंत्री होण्यावरून दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. 

जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही

जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही. असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले होते. यानंतर आता मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीत दोन गट आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणून धारशिव, नागपूर आणि आता उल्हासनगर येथे बॅनर झळकले आहेत. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ncp amol mitkari claims maha vikas aghadi govt will come and ajit pawar will be the cm of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.