Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. यातच आता महाविकास आघाडीकडून नवे शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार, याबाबत भाकित वर्तवत तारखा दिल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-भाजप सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकेल, असे भाकित वर्तवले आहे.
बोदवड येथे आयोजित संवाद यात्रेवेळी अमोल मिटकरी बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर ५० खोके आणि एकदम ओके असे म्हटले तर एवढे का लागले? लहान मुलेही आता ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. त्या खोक्यांमध्ये बिस्किट, इंजेक्शन असू शकतात. शिंदे गटाचे आमदार म्हणतात आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर शिंगावर घेऊ. मग आता बैलांवर ५० खोके, एकदम ओके लिहिले, असा टोला मिटकरी यांनी यावेळी लगावला.
पान टपरीवर चुना लावणारे गद्दार निघाले
पान टपरीवर चुना लावणारे गद्दार निघाले, अशी बोचरी टीका करत, ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, त्या दिवशी १६ आमदार अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते.