अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दौरा आहे. मात्र, यावेळी पंतप्रधान मोदींची वेषभूषा आणि त्यांच्या आगमनाचे लावलेले फलक यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पांडुरंगापेक्षा मोठे नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. हा तुकोबारायांचा तसेच वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. याबाबत भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीने आज नाटक सुरू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे. भाजपने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. पंतप्रधान मोदींच्या तुकोबरायांच्या वेशातील फोटोवरही आक्षेप घेतला. तसेच यामागे भाजपची आध्यात्मिक आघाडी असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.
PM मोदी पांडुरंगापेक्षा मोठे नाहीत, हा तुकोबारायांचा अपमान
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला आहे. ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानले त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली. यामागे भाजपाच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे. भाजपाकडून वारंवार अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप होत आहे. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही. हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे यामागील मेंदू शोधला पाहिजे, अशी घणाघाती टीका अमोल मिटकरी यांनी केली.
दरम्यान, अशा कृत्याचा निषेध करतो. नरेंद्र मोदींनी, त्यांच्या पक्षातील लोकांनी महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी. इथला वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.