मुंबई: देशातील राज्यसभा (Rajya Sabha Election 2022) आणि राज्यातील विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2022) निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने अलीकडेच विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पुन्हा डावलल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही टीका करत, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करणे हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचेच षड्यंत्र असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे.
भाजपने पंकजा मुंडे यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली. भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने उमेदवारी देताना मराठा, धनगर, ब्राह्मण, ओबीसी असे समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला
पंकजा मुडेंचा पत्ता कट करणे हे देवेंद्र फडणवीस यांचे षड्यंत्र
भाजपकडून विधान परिषदेसाठी ज्यांची नावे समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने दोन नावे नवीन आहेत. जुन्या काळात भाजपा वाढवण्यासाठी ज्यांनी जिवाचे रान केले त्या गोपीनाथ मुडेंची कन्या पंकजा मुंडे यांचा जाणीवपूर्वकपणे विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीमधून पत्ता कट केला. हे सर्व षड्यंत्र देवेंद्र फडणवीसांचे आहे. पंकजा यांच्यासोबतच विनोद तावडेंनाही जाणीवपूर्वकपणे डावललण्यात आल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…
मावळते आमदार विनायक मेटे, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांनाही भाजपने उमेदवारी नाकारली. भाजपने जारी केलेल्या या उमेदवारांच्या यादीमध्ये मेटे आणि खोत यांची नावे नसल्याने भाजपाच्या या दोन्ही मित्रपक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यासंदर्भातही अमोल मिटकरी यांनी फिरकी घेतली आहे. त्यांना राजकीय आत्महत्याच करावी लागलीय. भावी उत्तरायुष्यात त्यांचे आयुष्यमान वाढो. त्यांना चांगले आरोग्य लाभो. लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, अशा वाटेवर तुम्हाला देवेंद्र फडणवीस इतके मोकाट सोडतील याची दुरान्वये कल्पना नव्हती. मला तर फार दु:ख झाले आहे. पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही. कारण मेटे आणि सदाभाऊ सभागृहात नसले तर सभागृह अगदी खाली झाले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे कैवारी आता थांबलेत. नव्हे तर महाराष्ट्र थांबलाय. आगामी काळात महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम जे देवेंद्र फडणवीसांनी थांबवलेय त्याचा हिशेब त्यांना चुकता करावा लागेल. खोत आणि मेटेंवर झालेला अन्याय महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.