अकोला: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळ अचंबित झाले. यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पूजा करावी, हे विठ्ठलाची इच्छा नव्हती, असे अमोल मिटकरी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या पंधरा दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. यानंतर आषाढी एकादशीला कोण पूजा करणार, यावरून तर्क-वितर्क लावले गेले. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस करतील, असे सूचित केले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध झाले. यावरून अमोल मिटकरी यांनी टोलेबाजी केली.
देवेंद्र फडणवीसांनी पूजा करावी अशी विठ्ठलाची इच्छा नव्हती
देवेंद्र फडणवीसांनी पूजा करावी, अशी विठ्ठलाची इच्छा नव्हती. आता विठ्ठलाने एकनाथाला बोलावले, अन् ते पूजा करणार आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. शासकीय पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचे सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे, कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनवाणीत ते आमदार अपात्र ठरल्यास, मग सर्व काही समोर येणार. मात्र देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
दरम्यान, त्यामुळे आता आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर द्यावे, सरकार नेमके आहे कोणाचे भाजप की शिवसेना, भाजपचे आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नाही, नसेल तर शिवसेनेचे आहे हे स्वीकारा. शिवसेनेचे सरकार पाच वर्षे टिकेल, अन् भलेही अंतर्गत कलह-गटबाजी असेल पण आज एकनाथ शिंदे हे एक शिवसैनिक म्हणून प्रत्येकाला आठवतात. अन् ते पूजा करणार आहे. अगोदरच या संदर्भात भाकीत केले होते की भाजपचा मुख्यमंत्री पूजा करणार नाही, आज ते खर ठरले, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.