Maharashtra Politics: ठाकरे सरकारच्या कार्यकाळात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर, नेत्यांवर गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आता शिंदे-भाजप सरकार आल्यापासून काही नेत्यांवरील कारवाया, चौकशा थंड होताना दिसत आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यावरील आरोपांसंदर्भात केल्या जाणाऱ्या कारवाया कमी झाल्याचे पाहायला मिळत असून, यावरून राष्ट्रवादीने किरीट सोमय्या यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
प्रताप सरनाईकांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याचे तक्रारदारांनी न्यायालयाला सांगितले आहे. यानंतर सरनाईक यांच्यामागील ईडीचा ससेमिरा बंद होण्याची शक्यता आहे. याप्रमाणे भावना गवळी यांच्याविरोधातील कारवाईची तीव्रता कमी होताना दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
दुःख सांगावे कुणाला??
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे. दुःख सांगावे कुणाला?? किरीट काका भाजपा व शिंदे सरकारने असे तुमच्यासोबत तरी वागायला नको होते... तुमच्या दुःखात आम्ही सर्वच सहभागी आहोत..., असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तत्पूर्वी, टॉप्स ग्रुपचे प्रवर्तक राहुल नंदा आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावरही हाच गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र, न्यायालयाने 'सी-समरी' अहवाल स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या . यात शिवसेनेच्या नेतेपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या नेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी माझी निवड केली, त्यांचे मी आभार व्यक्त करते. एक शिवसैनिक ते खासदर असा माझा प्रवास असताना आता मला शिवसेना नेतेपदाची जवाबदारी दिली आहे ती मी भक्कमपणाने पार पाडेल. मी महिला खासदार म्हणून आतापर्यंत जी कामे केली आहेत, अश्या पद्धतीने पक्ष मजबूतसाठी जे मला करता येईल ते मी करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षमजबुतीसाठी काम करेल, असे भावना गवळी यांनी म्हटले.