मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच आता महाविकास आघाडीतील अन्य पक्षही शिवसेनेच्या पाठिशी असल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना फोडण्यामागे भाजपच असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादी नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.
ठाकरे सरकार कोसळल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. गुवाहाटी, सुरत, गोव्याला राहायला पैसे आहेत. दिल्लीच्या वाऱ्या करायला पैसे आहेत, ३ स्टार ५ स्टार हॉटेलमध्ये खानावळी उठवायला पैसे आहेत. मात्र, पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करायला पैसे नाहीत. वाह रे निर्लज्ज सरकार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
शिवसेना फोडण्यामागे भाजपच
शिवसेना फोडण्यामागे भाजपचाच हात. महाराष्ट्रातील व विशेषत: मुंबईतील मराठी माणूस टिकण्याकरिता शिवसेना पक्षाला तळागाळातील मराठी माणसाने ताकद देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अन्यथा भाजप नावाचा पक्ष भविष्यात मुंबईसह महाराष्ट्र विकून टाकेल हे निर्विवाद सत्य आहे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. याशिवाय, अमोल मिटकरी यांनी सपोर्ट शिवसेना असा हॅशटॅगही दिला आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी मारामाऱ्या होतील, असे भाकीत अमोल मिटकरी यांनी केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत आहोत. पुरंदरेंनी साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जेवढी बदनामी केली तेवढी कोणीच केली नाही, असेही यावेळी मिटकरी म्हणाले.