Maharashtra Politics: BBC च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली. सूत्रांच्या माहितीनुसार बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयसोडून घरी जाण्यास सांगण्यात आले. यानंतर आता या कारवाईवरून विरोधक आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. अलीकडेच बीबीसीने पंतप्रधान मोदींवर तयार केलेल्या एका माहितीपटावर बंदी घालण्यात आली.
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते तसेच देशातील विरोधी पक्षही आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून भाजप तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. बीबीसीवरील कारवाईवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे, असे ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.
अदानीचे पाप झाकण्यासाठी BBC कार्यालयावर IT धाडी
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यात, देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानी चे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी.. मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे, असे ट्विट करत अमोल मिटकरींनी टीका केली. तसेच या ट्विटसह जागो भारतवासी असा हॅशटॅग दिला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बीबीसीवरील कारवाईवरून मोदी सरकारवर टीका केली. BBC ने मोदींवर एक डॉक्युमेंट्री बनवली आणि लगेच BBC च्या कार्यालयावर IT च्या धाडी पडू लागल्या. ५६ इंचाच्या छाती किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले, अशी खोचक टीका पटोलेंनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"