Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नव्या शिंदे-फडणवीस सरकावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा प्रश्न आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दौरा करत बळीराजाला झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत अब्दुल सत्तार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया जुलैमध्ये संपली आहे. तथापि, काही भागात जुलैपासून मुसळधार पाऊसही पडला आहे आणि याचा हिशेब घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारकडून बाधितांसाठी मदत योजना तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यानंतर अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात बांधावर जाऊन नुकसान पाहणी केल्यावरून टोला लगावला आहे.
अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा नांदेड भागात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे रात्री अंधारात गेले. अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. तत्पूर्वी अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला.