Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोणत्या मुद्द्यांवरून कलगीतुरा रंगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच विधानाचा आधार घेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुका लढविण्याचे वक्तव्य केले होते तर आता बावनकुळे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे. यातच अमोल मिटकरी यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा
अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, एकनाथराव शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, अर्थ साधा सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही !जागे व्हा !!, असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. २०२४ मध्ये फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करू, असे सूतोवाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची तसेच कोअर कमिटीची बैठक नागपुरात होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहतील. सुरुवातीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"