मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीला पोहोचलेला सत्तासंघर्ष आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा यानंतर आता एकनाश शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन करण्याचे जाहीर केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा केली. देवेंद्र फडणवीसांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक वेगळीच शंका उपस्थित केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच अमोल मिटकरी यांनी ट्विट करत यावर काही प्रश्न उपस्थित केले. सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलं होतं, "सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||" महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !!, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल, अशी शंका अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना, पायाभूत सुविधांच्या कामांना स्थगिती, विकास योजना नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराकरिता जेलमध्ये जाणं अत्यंत आश्चर्याची, खेदजनक गोष्ट होती. एकीकडे बाळासाहेबांनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे, त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो, तरी मंत्रिपदावरून काढण्यात आले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यावेळी हे सरकार गेले, तेव्हा महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. हे सरकार कधीही पडेल, असे सांगायचो. लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही, पर्यायी सरकार देऊ, असे म्हणायचो. शिवसेनेचा विधिमंडळ गट, भाजपचा विधिमंडळ गट आणि १६ अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असा मोठा गट सोबत आलेला आहे. अजून काही लोक येत आहेत. यांचे पत्र राज्यपालांना दिले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.