“अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान PM मोदींना हवे होते”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:59 PM2022-06-14T17:59:51+5:302022-06-14T18:12:55+5:30
तुकोबारायांचा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये, याची काळजी भाजपने घ्यावी, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला.
मुंबई: श्री संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौऱ्यावर होते. त्यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोहगाव विमानतळावर स्वागत केले. त्यासोबतच, नरेंद्र मोदींसोबत या लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. यातच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना असायला हवे होते, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खंत व्यक्त केली आहे.
अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे. मोदीजी चूक दुरुस्त करा, असे सांगत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भले तरी देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे काठी हाणु माथा||
तुकोबारायांचा "भले तरी देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे काठी हाणु माथा||" हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत इतके भान प्रधानमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांना असायला हवे होते. धार्मिक ठिकाणी जर राजकारण करत असाल तर वारकरी सांप्रदाय व महाराष्ट्रातील जनता हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला.
धार्मिक कार्यक्रम भाजपने राजकीय करून टाकला
श्री क्षेत्र देहू हे वारकरी धर्माचे पवित्र स्थळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सामान्य वारकरी म्हणून इथे आले असतील तर "भेदाभेद भ्रम अमंगळ" या तुकोबारायांच्या अभंगाचा त्यांना सोयीने विसर पडला व हा धार्मिक कार्यक्रम भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने राजकीय करून टाकला. संतश्रेष्ठ तुकोबांच्या नगरीत हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच अमोल मिटकरी यांनी एकामागून एक ट्विट करत या घटनेवर मोठी नाराजी व्यक्त केली.
तुकोबारायांचा "भले तरी देऊ कासेची लंगोटी l नाठाळाचे काठी हाणु माथा ll "हा अभंग स्वतःवर उलटण्याची वेळ येऊ नये याची काळजी श्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या अध्यात्माच्या नावाखाली धर्मीक द्वेष पसरवणाऱ्या आध्यात्मिक आघाड्यातील तथाकथित आचार्यांनी घ्यावी.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 14, 2022