मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी ईडी कारवाईचा संबंध राज्यपालांनी केलेल्या विधानाशी जोडत भाजपवर टीका केली आहे.
राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला
अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी. आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला, अशी घणाघाती टीका केली आहे. दुसरीकडे, राऊत यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होतेय ही बाब अंगणवाडीतला मुलगाही सांगेल. संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याने शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपने ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत. ईडीच्या कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेक नेते भाजपसोबत गेले. शिवसेनेचे आमदार फुटले. मात्र या संकट काळातही राऊत पक्षासोबत राहिले. त्यांनी पक्ष नेतृत्त्वाची साथ सोडली नाही. ही बाब महाराष्ट्र विसरणार नाही. राऊतांनी ईडीसमोर गुडघे टेकले नाहीत. अनेक आमदार पक्ष सोडून गेले असतानाही राऊत यांनी एकहाती किल्ला लढवला, याची दखल इतिहासात घेतली जाईल, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रोज सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचे समाधान आहे. पत्राचाळीतील लोकांना आता न्याय मिळेल, असे वाटत आहे. झुकेगा नहीं वगैरे म्हणणाऱ्यांना आता कळेल. भ्रष्टाचार, महिला अत्याचार करायचा आणि आपल्याला काहीच होणार नाही असे त्यांना वाटायचे. मात्र आता त्यांना कळेल. पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केलेली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा व्हायलाच हवी. भ्रष्टाचाराची किंमत चुकवावी लागेल तर तुम्ही कुणीही असलात तरी चौकशी होणारच, असे भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.