Maharashtra Politics: औरंगाबाद शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर ’धाराशिव’ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. यानंतर आता श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार व महाविकास आघाडीमधील नेते या मुद्द्यावरून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.
नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी त्या निर्णयाचा फोटो शेअर केला. तसेच हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल, तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद, असे यापुढे लिहावे लागेल का? हेही देवेंद्र फडणवीसांनी सांगावे, अशी विचारणा अंबादास दानवे यांनी केली. यातच अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली.
नामांतराचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, भाजपने असुरी आनंद घेऊ नये
श्रेयवादाची लढाई नाही, निश्चितच नामांतर झाले याचा आनंद आहे. मात्र भाजपने याचा असुरी आनंद घेऊ नये. हे श्रेय महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न होते की, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करावे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतान त्यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाविकास आघाडीसमोर हा प्रस्ताव ठेवला. २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना ते करता आले नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आता आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम भाजपकडून होत आहे, अशी टीका अमोल मिटकरींनी केली.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो की, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जो निर्णय घेतला होता, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव कारायचे, त्याला मान्यता दिली. त्यानुसार अधिसूचना काढलेली आहे. ही अधिसूचना काढल्यानंतर आता जिल्ह्याचे नाव बदलण्याची अधिसूचना महसूल विभाग काढेल आणि महानगरपालिका व नगरपालिका नाव बदलण्याचे नोटिफिकेशन हे नगरविकास विभाग काढेल. या दोन्ही नोटिफिकेशनची तयारी झालेली आहे. त्यामुळे यात कुठलाही गोंधळ नाही. नाव जे बदलले आहे ते शहर, तालुका, जिल्हा आणि महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांचेच बदलले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"