मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या ठाकरे (Maha Vikas Aghadi Govt) सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावरून राज्यपालांवर टीका केली आहे. नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी घेतली आहे.
महामहीम राज्यपाल महोदय दडपशाही खाली आहेत का हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजून पर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणी चा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे, असे एक ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच आणखी काही केलेल्या ट्विटमध्येही या सर्व राजकीय घडामोडींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रसारमाध्यमांना दिला इशारा
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून दिल्या जात आहे. यावर आक्षेप घेत, काही वृत्तवाहिन्या मुख्यमंत्री राजीनामा देतील असे चार दिवसांपासून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना प्रामाणिकपणे व नम्रतेने सांगतो जोपर्यंत बहुमत चाचणी होणार नाही तोवर राजीनाम्या बाबत भाष्य करु नये, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच राज्यपालांचे वर्तन घटनाविरोधी असल्याचा दावाही केला आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला विश्वासात घेतल्या शिवाय राज्यपाल बहुमत चाचणी प्रक्रिया घेतील तर ते घटनाबाह्य ठरेल, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. याचाच आधार घेऊन राज्यपालांचे अनेक वर्तन घटना विरोधी, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.