Maharashtra Political Crisis: अलीकडेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून राज्यपालांवर सडकून टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताचे नाव जगात उंचावले जात असल्याच्या भाजपच्या दाव्यावरूनही अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यपालांवरही बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींच्या आधी भारताला ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. राजेंद्र प्रसाद ,पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सारख्या नेत्यांच्या विद्वत्तेमुळे जगभराने भारताला मुजरा केला आहे. मोदीचे एजंट बनलेल्या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही
दुसऱ्या एका ट्विटमध्ये, महाराष्ट्राने आजवर २१ राज्यपाल बघितले त्यातील पहिले राज्यपाल श्रीप्रकाश अत्यंत सुसंस्कृत होते आणि तीच परंपरा पुढे सुरू राहिली. मात्र २१ वे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागील सुसंस्कृत राज्यपालांच्या परंपरेला पार धुळीस मिळवले आहे. या महोदयांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, अशी टीका करणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले होते.