Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांच्यासह रवी राणा यांचा समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, यानंतर रवी राणा नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रवी राणा आणि भाजपवर शेलक्या शब्दांत निशाणा साधला.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यावरून चांगलेच चर्चेत आले होते. तेव्हा शिवसेना आणि राणा-दाम्पत्यांमधील संघर्ष शिगेला गेल्याचे पाहायला मिळाले. यानंतर या दोघांना अटक करून काही दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता. भाजपने राणा दाम्पत्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रवी राणा यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी अटकळ बांधली गेली होती. मात्र, तसे झाले नाही. यावरून अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
रवी राणांना आता ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज
हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालुन फिरणारे रवी राणा, अखेर वैफल्यग्रस्त झालेत. देवेंद्र फडणवीस ठरवतील त्यांना मंत्री पद मिळतं याचा अर्थ त्यांना नव्याने"देवेंद्र चालीसा" वाचण्याची गरज आहे. रवी राणा यांना धर्म रक्षणार्थ मंत्रिपद मिळालेच पाहिजे, अशी खोचक टीका अमोल मिटकरींनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाईन सरकार चालवले. मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मजबूत सरकार आले आहे. मी कधीही मंत्रिपद मागितले नाही आणि मी नाराजही नाही. कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची जाण आहे. ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील, असे आमदार रवी राणा यावेळी म्हणाले. अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची फडणवीस यांना चांगली कल्पना आहे, ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.