Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडूनही याला प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र, या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह तीव्र होत चाललेला असून, एका पक्षातील नेतेच एकमेकांना नोटिसा बजावताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद वाढत चालला आहे. समाजात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ५ कोटींचा मानहानीचा दावा आता मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर केला. तशी नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याच नोटिसीवर ‘मैं झुकेगा नहीं’, असा पलटवार मोहोड यांनी केला आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवा मोहोड यांच्यासह (Shiva Mohod) अन्य दोघांना ही मानहानीची नोटीस बाजवण्यात आली आहे.
माफी न मागितल्यास कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल
अमोल मिटकरींच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने एक व्हिडिओ तयार केला होता. ज्यामध्ये मोहोड यांच्याकडून मिटकरींना "घासलेट चोर" (केरोसिन चोर) असे संबोधले होते. आणि खोटे आणि बनावट असल्याचा आरोप करण्यात आले होते. यासोबतचे चारित्र्यावर आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, जे निंदनीय आहे. याशिवाय विविध बदनामीकारक आरोप केले आहेत. त्यामुळे मिटकरींची प्रतिमा, प्रतिष्ठा आणि स्थान मलीन केले आहे. मानसिक छळ आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर मिटकरींवर आरोप करणारे शिवा मोहोड आणि अन्य दोघांना नोटीसद्वारे ७ दिवसांच्या आत लेखी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. या नोटीसची पावती आणि पाच कोटीची नुकसान भरपाई देखील केली आहे. माफी न मागितल्यास कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पाच कोटी यांनी वर्षभरात कमावले
आमदार साहेबांनी नोटीस पाठवली आहे. पाच कोटीची नोटीस आहे. पाच कोटी यांनी वर्षभरात कमावले. पण माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाला पाच कोटीची किंमत माहिती आहे. घाम जेव्हा गाळतो ना, तेव्हा पाच कोटी रुपये मिळवले जातात. चापलुसी करून पैसे कमावणे हे सोपे आहे, म्हणून पाच कोटीची नोटीस पाठवली आहे. पक्षांतर्गत बोलल्यामुळे नोटीस पाठवली आहे की जे पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामुळे नोटीस बाजवली?, असा सवालही मोहोड यांनी केला आहे. या नोटीसला उत्तर देईल. परंतु अशा नोटीस कितीही पाठवल्या तरी घाबरणार नाही. 'जे' सत्य आहे ते जनतेसमोर माडियातून मांडणं बंद करणार नाही. येणाऱ्या काळात 'जो' दिवस ठरला आहे, त्या दिवशी मिटकरी यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेईल म्हणजे घेईन. 'मैं झुकेगा नहीं', असा डायलॉग म्हणत शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरींना पुन्हा इशारा दिला आहे.