मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून NCP आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 08:24 AM2024-08-22T08:24:30+5:302024-08-22T08:41:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात. आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवारही मतदारसंघात प्रचाराला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर महायुती सरकारनं विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. महायुतीत अजित पवारांच्या पक्षाला किती आणि कुठल्या जागा मिळतील हे अद्याप स्पष्ट नाही. त्यातच पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांचे मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघात संभाव्य उमेदवार म्हणून बॅनर्स झळकले आहेत.
मुंबईतील वरळी मतदारसंघात अमोल मिटकरी निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून संभाव्य उमेदवार म्हणून बॅनर्स लावण्यात आले आहेत. वरळी विधानसभेवर पुन्हा घड्याळ अशा आशयाचे हा बॅनर आहे. त्यात वरळीतील संभाव्य उमेदवार म्हणून अमोल मिटकरींना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रखर वक्तृत्व शासनावर पकड अशी त्यांची ओळख, वरळीकरांची पसंत घड्याळ, सामान्य माणसांची पसंत घड्याळ, हीच ती वेळ पुन्हा घड्याळ घड्याळ कट्टर समर्थक अजितदादा पवार असा मजकूर या बॅनरवर आहे. राष्ट्रवादीचे मुंबई सरचिटणीस नागेश मढवी यांनी हा बॅनर वरळी नाका परिसरात लावलेला आहे.
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी वरळीचे माजी आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर वरळीचे तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी आदित्य ठाकरेंना पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत आघाडीकडून सुरेश माने रिंगणात होते. मनसेनं या मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. त्यावेळी आदित्य ठाकरे वरळीतून निवडून आले होते.
वरळी मतदारसंघावर महायुती, मनसेची नजर
२०२४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात विरोधकांनी रणनीती आखली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला अवघ्या ६ हजारांचे लीड मिळाले. त्यामुळे या मतदारसंघाची लढत चुरशीची बनली आहे. याठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे उभे राहणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी देशपांडे वरळीतील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. महायुतीकडून या मतदारसंघात कुणाला उतरवलं जाणार हे स्पष्ट नाही. परंतु अमोल मिटकरींची संभाव्य उमेदवार म्हणून लागलेले पोस्टर चर्चेत आले आहेत. वरळी मतदारसंघात सचिन अहिर हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र शिवसेनेच्या सुनील शिंदेंकडून अहिर यांचा पराभव करण्यात आला. आता सचिन अहिर, सुनील शिंदे हे दोघेही ठाकरे गटात आहेत.