Maharashtra Political Crisis: “अजितदादांचे भाषण देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी’पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 06:41 PM2022-07-04T18:41:15+5:302022-07-04T18:42:03+5:30
औट घटकेचे मुख्यमंत्री, गत सरकारमधील विरोधी पक्षनेते व सद्य स्थितीत सहा महिन्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यावेळेला सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी जोरदार फटकेबाजी केली. टाळ्या, हशा, टोलेबाजी यांमुळे सभागृह दणाणून निघाले. यानंतर आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या भाषणावरून आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर टीका केली आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात ज्या पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, त्या सत्ता संघर्षाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बंडखोर आमदारांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपांना थेट आकडेवारी देऊन उत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या भाषणानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी’पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले
विधानसभेतील अजितदादांच्या आजच्या भाषणाने औट घटकेचे मुख्यमंत्री, गत सरकारमधील विरोधी पक्ष नेते व सद्य स्थितीत सहा महिन्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "मी" पणाच्या भाषेवर बुलडोझर फिरविणारे ठरले, असे टीकास्त्र अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमधून सोडले.
दरम्यान, मविआचे सरकार आले, तेव्हा मी म्हणत होतो, हे सरकार अनैसर्गिक आहे. तेव्हा मी एक कविता म्हटली होती. त्यातून 'मी पुन्हा येईन', असे म्हटले होते. पण तेव्हा माझी बरीच टिंगल टवाळी झाली. पण मी पुन्हा आलो, एकटाच आलो नाही, तर यांनाही घेऊन आलो, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.