Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून, भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. याबाबत शिंदे गटाने वेगळी भूमिका घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावर भाष्य केले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, अजित पवार जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच असेल, असे म्हटले आहे.
अमोल मिटकरी हे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात. मीडियाशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवारांबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या मिथ्या आहेत. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचे काम कुणीतरी करत आहे, अशी शंका अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली.
अजित पवार जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच असेल, परंतु...
भाजपकडून या कांड्या पिकवल्या जातायत का, ते तपासले पाहिजे. अजित दादांना ठरवून टार्गेट केले जातेय का याची शहानिशा व्हायला हवी. भाजपचे लोक तोंडसूख घेत असतील तर त्यांना घेऊ दे. रवी राणांसारख्या लोकांना बोलू देत. परंतु या चर्चेत तथ्य नाही. अजितदादा उपमुख्यमंत्री होते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गटनेते आहेत. त्यामुळे दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्यच असेल. पण दादा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतील हे कोणी सांगितले. अजित पवार हे पवारसाहेबांच्या शब्दाबाहेर जातील असे तुम्हाला वाटते का? त्यामुळे या सर्व चर्चा केवळ मिथ्या आहेत, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार रिचेबल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात चालणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र पक्ष आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्न येत नाही, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता, दर महिन्याला आमदार अजित पवार यांना भेटत असतात. ते विरोधी पक्षनेते आहेत. माझ्या जिल्ह्यातील काही प्रश्न असतील तर मीदेखील जाऊन भेटत असतो. अजित पवार नाराज नाहीत. ते योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम विरोधकांचा करतील, असा दावाही अमोल मिटकरी यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"