Bageshwar Baba On Sant Tukaram Maharaj: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी आक्रमक झाले असून, बागेश्वर बाबा दिसेल, तिथे ठोकून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते. त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे की, अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचे थोबाड बंद होते. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि अधिष्ठानाला जर असा महाराज काही बोलत असेल, तर मला असे वाटते की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा-बाबांचे पीक फोफावले
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा-बाबांचे पीक फोफावले आहे. बागेश्वर बाबा, त्याला श्याम मानव यांनी बक्षीस जाहीर केले होते. तोच बागेश्वर संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीवर बोलतो आहे. आईसाहेब उर्फ जिजाबाई स्वत: डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या. तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर जाऊन त्याने विधान केलं आहे. मला असे वाटते की वारकरी सांप्रदाय काय आहे, हे बागेश्वर बाबाला माहिती नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्य प्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेले महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावे. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"