Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. यातच शिवसेनेला नवे नाव आणि चिन्हही मिळाले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असून, आता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढली जाणार आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, केवळ अंधेरी पोटनिवडणूक नाही तर, शिवसेना मुंबई महापालिकेतही भगवा फडकवणार असल्याचा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर निशाणा साधत शिवसेनेला मिळालेल्या नव्या निवडणूक चिन्हावर भाष्य केले आहे. शिवसेनेला 'मशाल' हे निवडणूक चिन्ह तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे. असे असताना शिंदे गट ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करत आहेत. यावरून अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असे अमोल मिटकरी म्हणाले.
शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही
जनसंघ, काँग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली आहेत. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसेनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच जनता पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे. तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनाला पाठिंबा आहे, असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवले असले तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेतही भगवा फडकवणार, असा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला. तसेच भावना गवळी, अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसले. शिवतारे यांचे आता वय वाढले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शिवतारेंची लायकी काय हे अजित दादांनी अनेकदा दाखवून दिली आहे, या शब्दांत विजय शिवतारे यांनी केलेल्या टीकेचा मिटकरी यांनी समाचार घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"