Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप-शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अशी विचारणा करताना देवेंद्रजी फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यातुन ते बेताल सुटले आहेत. पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरलेत. मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहतो मात्र परवा मुलाखतीत ते आतुन पोखरल्याचे व शिंदेंसोबत बिनसल्याचे स्पष्ट जाणवते आहे, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
जनता माफ करेल असे वाटते का?
हे सुराज्य व्हावे हीच जनतेची इच्छा, अशी जाहिरात केल्याचा फोटो मिटकरींनी शेअर केलाय. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत नाही. त्यावरून अमोल मिटकरींनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असे वाटते का?, असे मिटकरी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांची मिस्ट्री समजून घ्यायची असले तर त्यांच्या हिस्ट्रीमध्ये जावे लागेल. तेव्हाच तुम्ही ही मिस्ट्री समजू शकता. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेले नाते तोडून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत येऊ शकते. आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ इच्छितो, असे सांगितले. त्यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरले की, महाराष्ट्रात भाजप-एनसीपीचे सरकार स्थापन केले जाईल. सरकार कसे असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी या सरकारचे नेतृत्व करणार, हेही ठरले. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.